इ.10 वी व इ.12 वी झाल्यानंतर पुढे करियरच्या कोणत्या वाटा निवडायच्या? कॉलेज, डिप्लोमा की दुरस्थ शिक्षण घ्यायचे?, नोकरी की व्यवसाय करायचा?, कॉलेज कसे निवडायचे ऑनलाईन की ऑफलाईन? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेले असतात. या प्रश्नांची उकल करण्यासाठी सफाळ्यात विनामूल्य शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन शिबीर बुधवार (दि.22) रोजी राजगुरू ह.म.पंडित विद्यालयात आयोजित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी अनंत कुडू, उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संस्था तर प्रमुख पाहुणे व समुपदेशक आर.जी.पाटील सर,पुणे व जिल्हा समन्वयक समुपदेशक रॉबर्ट आल्मेडा सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत माजी विद्यार्थी संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन वर्तक, सरचिटणीस राजनकुमार राऊत, अमृते शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ऍड.दीपक भाते, प्राचार्या मधुमती कुलकर्णी व 100 विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने उराशी स्वप्न बाळगलं पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न पण केले पाहिजेत. आज कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्राव्यतिरिक्त हजारो अभ्यासक्रम निर्माण झाले आहेत परंतु, ग्रामीण भागात या क्षेत्रांबाबत पालक अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात वेबसाईट व इंटरनेटवर विपुल माहिती अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. ही माहिती आपण मिळवली पाहिजे, असे समुपदेशक आर.जी.पाटील सरांनी मार्गदर्शन करताना म्हटले. शिबिरात सरांनी विविध शाखांची विस्तृत माहिती देताना आर्टिफिशियल इंटेलिजंट, थ्रीडी ऍनिमेशन, फिल्म इंडस्ट्री, मोबाईल टेक्नोलोजी, फॅशन डिझाईनिंग, इंटिग्रेटेड कोर्सेस अशा नानाविध अभ्यासक्रमांची माहिती देत संबंधित महाविद्यालयांची माहिती दिली. रॉबर्ट आल्मेडा यांनी ऑनलाईन महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया, एस.सी.आर.टी. ची ध्येयधोरणे, शासकीय योजनांची माहिती दिली. अनंत कुडू यांनी माजी विद्यार्थी संस्थेचे उपक्रम सांगताना संस्थेचे सदस्य होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजनकुमार राऊत सरांनी केले. सूत्रसंचालन जतिन कदम यांनी केले तर आभार सुजाता घरत यांनी मानले. शेवटी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी शरद घरत, रमाकांत घरत, वैशाली पाटील, प्राची पाटील यांचे सहकार्य लाभले.